आज 12 सप्टेंबर… घरी गौरी आणताना चुकूनही करू नका या चुका…

0
238

नमस्कार मित्रांनो,

गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचारा प्रमाणे गौरी बसविल्या जातात.

मित्रांनो पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते.

यावेळी
गौरी आली, सोन्याच्या पावली.
गौरी आली, चांदीच्या पावली.
गौरी आली, गाई वासराच्या पावली.
गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली.

असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.

ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते.

गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात.

कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रित असते. तर काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते.

पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, 5 कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो.

यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात.

संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.

तिस-या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here