उद्या 13 सप्टेंबर असे करा शास्त्र शुध्द गौरी पूजन… संपूर्ण माहिती मराठी मध्ये…

0
213

नमस्कार मित्रांनो,

आज 12 सप्टेंबर 2021 रविवार या दिवशी गौरी आवाहन आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीस दरवर्षी आपण गौरी आवाहन करतो. उद्या 13 सप्टेंबर 2021 रोजी गौरीपूजन केले जाईल. महानैवेद्य दाखवला जाईल. आणि 14 तारखेला गौरींचे विसर्जन होईल.

भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते.

रविवार 12 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होईल. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 सप्टेंबर 2021 रोजी गौरी पूजन केले जाणार आहे. गौरी पूजनाचा एकूण उत्सव तीन दिवस असतो.

गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन कसे करावे? गौरी पूजनाचा विधी, आरती आणि विसर्जनाची वेळ यांबाबत जाणून घेऊया.

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते.

सोमवार 13 सप्टेंबर 2021 रोजी गौराई किंवा महालक्ष्मीचे पूजन करावे. सकाळी नित्योपचार आटपल्यांतर गौरी वा महालक्ष्मीचे आवाहन करावे. यानंतर षोडशोपचार पूजा करावी. पूजा झाल्यावर आपापल्या परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी.

नैवेद्य

रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसारखे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. तसेच शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्यात समावेश केला जातो.

केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरी पूजनाच्या सायंकाळी महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.

गौरी विसर्जन

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा, असे एक एक जिन्नस घालतात.

हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो. गौरींची किंवा महालक्ष्मींची पूजा व आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात.

मंगळवार 14 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनंतर ज्येष्ठागौरी विसर्जन करावे. गौरींचे विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरभर व झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते, अशी समजूत आहे.

प्रत्येक प्रांत आणि भागाप्रमाणे गौरी उत्सवाची पद्धत बदलते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here