झी मराठी वरील अग्गंबाई सासूबाई या गाजलेल्या मालिकेतील कडक शिस्तीचे पण तेवढेच प्रेमळ सासरे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. अभिनेते रवी पटवर्धन यांनी दत्ताजी ही भूमिका अत्यंत उत्कृष्ट साकारली. पण मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे.
आज सकाळी अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले.

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज 6 डिसेंबर 2020 निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
रवी पटवर्धन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यांमुळे त्याचा विशेष दरारा वाटायचा.
आणि त्याचमुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश किंवा खलनायकी तसेच नकारात्मक प्रवृत्तीच्या भारदस्त अशा भूमिका मिळायच्या.
रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास 150 हून अधिक नाटक तर 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या सर्वच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक हे नाटक केले. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली.
वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते. रवी पटवर्धन यांनी आईची सेवा करता यावी यासाठी लग्न केले नाही.
रिझर्व्ह बँकेत नोकरी
रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली.
वयानुसार येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला. त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली.
शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला. त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.
रवी पटवर्धन यांना मराठी धिंगाणा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…